पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सेवानिवृत्त अतिरिक्त आयुक्त आणि सायन्स पार्कचे संस्थापक प्रवीण तुपे यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष व ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी तुपे यांचे नाट्यगृह निर्मितीतील महत्वाचे योगदान अधोरेखित केले. दामले म्हणाले की, तुपे यांनी प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहाचे निर्माण करताना कलाकारांच्या गरजा विचारात घेतल्या, त्यामुळे नाट्यगृह आजही उत्तम स्थितीत आहे. त्यांचा कलाकारांशी असलेला घनिष्ठ संबंध आणि त्यांना दिलेले सततचे सहकार्य याचीही त्यांनी प्रशंसा केली.
कार्यक्रमाला खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, शिवसेनेच्या जिल्हासंघटिका सुलभा उबाळे, माजी महापौर नितीन काळजे, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. सुरेखा कुलकर्णी यांनी तुपे यांच्या कार्यावर कविता सादर केली, तर तुपे यांच्या कार्याची ध्वनीफीत दाखवण्यात आली. संजय कांबळे यांनी मानपत्राचे वाचन केले व तुपे यांचा पगडी व मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
प्रशांत दामले यांनी आपल्या भाषणात २२ वर्षांच्या मैत्रीच्या अनुभवांचा उल्लेख केला आणि सांगितले की, तुपे यांच्या शिक्षणामुळे त्यांना कोणत्या परिस्थितीत कसे बोलावे हे उत्तम जमते. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहाची सुस्थिती ही तुपे यांच्या विचारशील नेतृत्वामुळे आहे. त्यांची कल्पकता केवळ नाट्यगृहापुरती मर्यादित न राहता त्यांनी सायन्स पार्कसारखा प्रकल्पही यशस्वीपणे उभारला आहे. दामले यांनी हा प्रकल्प देशभरात पोहोचावा यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
आमदार अमित गोरखे यांनी तुपे यांचे अभियंता म्हणून केलेले काम, त्यांच्या कामातील प्रामाणिकपणा आणि शहराच्या विकासातील त्यांच्या योगदानाचे कौतुक केले. आमदार उमा खापरे यांनी तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरुवात कशी झाली, याचा उल्लेख करून स्वरसागर महोत्सवाच्या यशस्वी आयोजनाचे श्रेय त्यांना दिले. सुलभा उबाळे यांनीही तुपे यांचे शांतपणे काम करणारे व्यक्तिमत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमात शहरातील अन्य मान्यवरांमध्ये किरण वैद्य, कैलास कदम, संदीप बेलसरे, अरुण बोहाडे, जवाहर कोटवानी, आणि डॉ. प्रकाश तुपे यांनीही प्रवीण तुपे यांचे विविध क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले.