“शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करून प्रत्यक्ष व्यावसायिक जगतात प्रवेश करताना अनेक आव्हानांचा सामना करावा लागेल. मात्र, सकारात्मक विचार आणि दृढ निश्चयाने यशस्वी वाटचाल नक्कीच साधता येईल,” असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे (पीसीईटी) विश्वस्त आणि पिंपरी-चिंचवड विद्यापीठाचे कुलपती हर्षवर्धन पाटील यांनी केले.
पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित पुणे बिझनेस स्कूलचा (PBS) दुसरा पदवी प्रदान सोहळा संस्थेच्या निगडी येथील सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ. पराग काळकर, डिलॉईटचे कार्यकारी संचालक रवी प्रताप सिंग, हॉर्टिकल्चर इन्सेक्टिसाईड इ.चे महाव्यवस्थापक प्रवीण जाधव, बीएनवाय मिलॉनचे उपाध्यक्ष बळीराम मुटगेकर, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, पीबीएसचे संचालक डॉ. गणेश राव, अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी त्यागी आणि पीसीईटी प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता डॉ. शितलकुमार रवंदळे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. गणेश राव यांनी प्रारंभी पीबीएसच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा सादर केला. यावेळी विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा प्रशस्तिपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमात बोलताना डॉ. पराग काळकर यांनी विद्यार्थ्यांना आव्हानात्मक युगात तंत्रज्ञानाच्या प्रगतीसोबत चालण्याचे महत्त्व सांगितले. “विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून त्याचा उपयोग स्वतःच्या प्रगतीसाठी करावा,” असे त्यांनी सांगितले.
बळीराम मुटगेकर यांनी रोजगाराच्या वाढत्या संधींचे महत्त्व सांगताना, “चांगले मनुष्यबळ निर्माण झाले तरच आर्थिक विकास शक्य आहे. विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणे काम केल्यास त्यांना नक्कीच यश मिळेल,” असे मत व्यक्त केले.
रवी प्रताप सिंग यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासाबाबत चर्चा करताना, “जरी AI विकसित होत असले तरी प्रत्यक्ष माणसाने काम केल्यासच खऱ्या अर्थाने प्रगती साधता येईल. विशेषत: कृषी क्षेत्रात शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करणे अधिक प्रभावी ठरते,” असे मत मांडले.
प्रवीण जाधव यांनी विद्यार्थ्यांना कौशल्य विकास आणि संवाद कौशल्य वाढवण्याचे महत्त्व सांगत, “आपल्या शिक्षणाच्या क्षेत्रातच काम केल्यास आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम केल्यास यश निश्चित आहे,” असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गणेश राव यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. मिनाक्षी त्यागी यांनी केले. पीसीईटीच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.